बारिश
aas story part-3 मराठी कथा: आस…. सगळ्यांसाठी असते खास…. भाग तीन
चहा घेत गाणी ऐकत ऐकत काव्याच्या विचारांची शृंखला काही तुटत नव्हती. आज दोघांनीही ऑफिसला सुट्टी घेतली होती. रिपोर्ट घेऊन गायन्याक डॉक्टरकडे जायचे होते दुपारी. पण हे पाच सहा तास तिला आता युग वाटत होते. आज तिने योगा क्लासलाही दांडीच मारली होती.
कालपासून तिचे मन सारखे भूतकाळात जात होते. चांगल्या सयींची आठव येता मनास येई उभारी,, थकल्या भागल्या शरीरास ही येई मग तरतरी… असे तिला वाटले.
ती परत भूतकाळात गेली. तिचे आय. टी. क्षेत्रातील पदवीचे शिक्षण पूर्ण होताच तिच्या घरी जेव्हा तिच्या लग्नाची बोलणी चालू झाली तेव्हाच तिच्या बाबांनी विशालबद्दल तिला विचारले. बाबांच्या जवळच्या मित्राचा नातलग होता विशाल. जिल्ह्यातील कॉलेजमधून इंजिनियरिंगची पदवी घेतलेला, हुशार, कष्टाळू, देखणा, मध्यम पण सधन कुटुंबात वाढलेला. भाऊ बहीण काका काकू या सर्वांच्यात राहिलेला, मोठ्या शहरात एका मल्टिनॅशनल कम्पनीत चांगल्या हुद्यावर काम करणारा….
बाबांना सगळीकडून योग्य वाटलं होतं. मग तिनेही होकार दिला. पाहण्याचा भेटण्याचा ठरवण्याचा कार्यक्रम एका आठवढ्यातच पार पडला. विशालला काव्या पहिल्या नजरेतच आवडली. एक तर सुंदर होतीच, पण तिच्या नावातच त्याचे काव्य होते.
विशाल जरी इंजिनिअरिंग क्षेत्रातला असला तरी त्याच्याकडे एक कवी मन होते. काव्याही तशी देखणी, उंची, बांधा, चाफेकळी नाक, गव्हाळ वर्ण, हुशार, संस्कारी अशी.
आई तर लग्न ठरलेल्या दिवसापासुनच तिला किती तरी गोष्टी सारख्या सांगत होती.
aas story part-3
लग्नाच्या दोन दिवस आधी सारी आवराआवर करून आई तेलाची वाटी घेऊन काव्याजवळ गेली नि तिला जवळ घेऊन आलेला हुंदका आवरत तिच्या केसांना तेल लावत बोलु लागली, “हे बघ काव्या तू आता एका नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेस. अलीकडील तुम्ही शिकल्या सवरलेल्या मुलींना जास्त काही सांगावे लागत नाही तरी माझ्या आपल्या मनातील पूर्वीच्या काही कल्पना अनुभव तुला सांगते. स्वतः कडे दुर्लक्ष करू नको तिकडे, आपल्या बरोबरच सर्वांचा विचार कर. जरी नोकरी पत्करली तरी घर संसार सासर माहेरकडील लोक यांना ही धरून ठेव, प्रसंगी तडजोड कर. मनात कितीही माहेर आवडले तरी कर्मात सासर असुदेत तुझ्या. सर्वांना आवडेल तो स्वयंपाक बनवत जा. मनात स्थान मिळवायचे असेल तर त्याचा मार्ग उदरातून जातो बघ. स्वतःही समाधानी रहा नि तिकडील सर्वांनाही समाधानी ठेव. विशाल तर खूप मायाळू प्रेमळ आहेतच थोड्याच दिवसात तू आम्हालाच विसरशील बघ.”
हे बोलता बोलता आईला हुंदका अवरणेच कठीण झाले नि दोघींचा बांध फुटला.
काव्याने आईला विश्वासाने सांगितले, “तुझे संस्कार नि शिकवण मी कधीच नाही विसरणार ग. तू नेहमी माझ्याबरोरच असशील.”
आईने काव्याला त्या दिवशी स्वतःच्या मांडीवर घेऊन झोपवले होते. उद्या मेहंदीने हात रंगतील नि हिरव्या चुड्याने अजूनच शोभा येईल हिच्या हाताला. काव्याच्या केसातून हात फिरवत आईही विचारात गढून गेली.
14 फेब्रुवारी 2007. काव्या कधीच विसरू शकणार नाही तिचा लग्नसोहळा. विशाल तिला मजेने नेहेमी म्हणायचा प्रेमाच्या महिन्यात एक प्रेमीयुगल लग्नबंधनात गुंफले. आधीच खूप प्रेमळ असलेल्या विशालला बरोबर लग्नासाठी प्रेमदिनाचा मुहूर्त मिळाला होता योगायोगाने.
जात्याच देखणी असलेली काव्या त्या दिवशी तर स्वर्गीय अप्सराच दिसत होती. आदल्या दिवशीच्या हळदीने तिच्या चेहऱ्यावर अजूनच तेज आले होते. अंजीरी रंगाची सोनेरी बुट्यांनी नि मोरांनी सजलेली पैठणी, त्याला साजेसा गर्द हिरवा काठ, भरजरी पदर, कपाळावर ठसठशीत चंद्र कोर, नाकात मोत्याची नथ, हातात सोन्याचे गोठ तोडे चुड्यात उठून दिसत होते. केसांचा अंबाडा त्यात मोत्यांची खोप, नि भोवतीने वेणी माळलेली, गळ्यात साज, नि ओठांवर तिचे ठेवणीतले स्मित. अस्सल महाराष्ट्रीयन सौन्दर्य.
विशाल मोहित होऊन मंत्रमुग्धपणे तिच्याकडे पाहतच राहिला होता. ती स्टेजवर येताच न राहवून त्याने सर्वांसमोर तिच्या सौन्दर्याची स्तुती केली होती. तिला जसेच्या तसे त्या ओळी आठवल्या…
तारीफों के पुल बांध तो दूं
सजदों में सर झुका तो लूं
हुस्न के कसीदे पढ़ तो दूं
पर शुरुवात कहा से करू?
ये काली घनी जुल्फ़े
या सागरसी आँखे,
शरासन सी मुस्कान लिए अधर
कोई छोड़ के जाए भी तो किधर
हूर सा हुस्न, कनक सी कांती
बयां के परे है,, आपकी खूबसूरती!
काव्या सर्वांसमोर लाजून अजूनच गुलाबी झाली होती त्या दिवशी. नव्या नवलाईचे ते गुलाबी दिवस तिला कधी विसरणे शक्य नव्हते. सुरुवातीच्या संसारातील चुकत चुकत शिकत शिकत केलेले सर्व, दमछाक व्हायची तिची. सारखे वाटायचे आई कसे सगळे हसत हसत मॅनेज करत असेल ?? आपणही करायला शिकलेच पाहिजे. विशालची तिला खूप मदत नि साथ होती. ती ही होईल तसे नि तेवढे
गावाकडील इकडील जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे निभावत होतीच. कमतरतेला कुठे जागा न्हवतीच मुळी. दोघेही एकमेकांना सांभाळून सर्व करत.
फक्त या काही दिवसांपासून काव्याच ह्या मातृत्वाच्या विषयामुळे सारखी उदास वाटत होती, कुठे तरी हरवल्या सारखी थोडी गप्प गप्प. पूर्वी स्वछनंदी उडणारे फुलपाखरू आताशी मलूल होत होते. विशाल उठून फ्रेश होऊन स्वतःचा चहा बनवून कधीचा तिच्या जवळ येऊन बसला होता, तरी ती आपल्याच विचारात गर्क होती. ती भूतकाळातच अजून हरवली होती. तिला त्याने हलवून विचारले मॅडम एकट्याच अश्या मंद स्मित करत का बसला आहात?? नक्की काय आठवत आहात म्हणून चेहरा असा खुलून आला आहे आज.
ती भानावर आली. त्याला काय सांगायचे की मी भूतकाळात जाऊन आपले लग्न आणखीन एकदा अनुभवून आले म्हणून. पण काही असो थोड्या वेळेसाठी का होईना मी तो नको असलेला विषय विसरले होते. ती हसली फक्त. हे पाहूनच तो खुश झाला. त्याला आणखीन काय हवे होते तिच्या ह्या हास्याशिवाय.
त्याला माहिती होतं त्याच काव्यमय बोलणं तिला खूप आवडतं म्हणून तिला अजून थोडे खुश करण्यासाठी तो तिचा हात हातात घेऊन बोलू लागला,
एक मी एक तू
जन्म मी जीवन तू
भेट मी गाठ तू
वृक्ष मी वेल तू
शब्द मी मौन तू
गीत मी कलम तू
शाई मी रंग तू
नजर मी सौन्दर्य तू
प्रेम मी सहवास तू
स्मित मी कारण तू
श्वास मी स्पर्श तू
इच्छा मी पूर्णता तू
प्रेमायुष्य म्हणजे मी आणि तू
त्याच्या या ओळींनी तर काव्या अजूनच खुश झाली ….
aas story part-3
पुढे चालू….
आस…, सगळ्यांसाठी असते खास भाग 1 आस….. भाग 2
इतर काही मराठी कथा
TheyWon English (Online Magazine)
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
One thought on “आस….. भाग 3 | Aas Story Part-3: Marathi Story”